Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 1

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीजगद्गुरु पंचाचार्येभ्यो नमः । श्रीउमामहेश्वराभ्यां नमः। श्रीमन्मथस्वामिने नमः ॥ ॐ नमो जी एकदंता । गणनायका शिवसुता । प्रज्ञा-प्रतिभेचा तू दाता । वक्रतुंडा गणपती ॥ १ ॥ आरंभिले ग्रंथलेखन । ते कृपेने करावे पूर्ण । अल्पमती मी विद्याहीन । म्हणूनि तुला वंदितो ॥ २ ॥ सारस्वतांची स्फूर्तिझरी । वीणावादिनी वागीश्वरी । विश्वमोहिनी तूच खरी । तुला माये वंदितो ॥ ३ ॥ सुखदु:खांच्या संसारगाथा । आदिकालापासून त्याच सर्वथा । परि तुझ्या कृपेने कथा-। रूप धारण करिती गे ॥ ४ ॥ काव्य महाकाव्य नाटक । अशी रूपे अनेकानेक । त्यांत तुझे दिसे कौतुक । रसिक-सारस्वतांना ॥ ५ ॥ ग्रंथरचनेसाठी म्हणून । तुझे मागतो कृपादान । सिद्घीस नेई परिपूर्ण । कामना माझी स्नेहाळे ॥ ६ ॥ जय जय शिवा विश्वरूपा । अनादिसिद्घ मायबापा । तुझी होता पूर्ण कृपा । अशक्य काही नसेचि ॥ ७ ॥ अनंत ब्रह्मांडांच्या कोटी । वसती तुझ्या रोमापोटी । उत्पत्ति-स्थिति-लय राहाटी । तुझ्याठायी पूर्णत्वे ॥ ८ ॥ वेलीवरी फुलावे पान । अथवा हळूच जावे गळून । तुझ्या इच्छामात्रेकरून । हे कवतिक घडतसे ॥ ९ ॥ तळहातीच्या गूढ रेषा । कोणा भ्रमविती दाही दिशा । कोण्या सुबुद्घा बैसे फासा । वासनेचा अनिवार ॥ १० ॥ कोणाचे आयुष्य वाळवंट । क्रमता जीवास होती कष्ट । उमलण्याआधीच नष्ट । फुल कोठे होतसे ॥ ११ ॥ फुलांचे ताटवे गंधित । कोणाच्या झुलती दारात । कोणाचे जीवनसंगीत । सरे सुगंधी श्वासापरी ॥ १२ ॥ कोणाचे आयुष्य तरल । कोणाच्या अंतरी कंटक-सल । हे प्राक्तन-ङ्गेरे सकल । घडती तुझ्या साक्षीने ॥ १३ ॥ जे तुजला अनन्यशरण । त्यांना सोसवे प्राक्तन दारुण । येर जे भ्रमती दिशाहीन । ते कळवळती व्यर्थचि ॥ १४ ॥ तुझ्या स्मरणी चालता वाट । कंटकशल्ये होती बोथट । तुझ्या कृपेचा वाहता पाट । देह-मन शांत होय ॥ १५ ॥ जय जय शिवा सर्वोत्तमा । भक्तकामकल्पद्रुमा । तूचि मूळ शिवागमा । म्हणूनि ग्रंथा साह्य करी ॥ १६ ॥ शिवागमांचे सार सकळ । ज्या ग्रंथात बिंबले निर्मळ । तो ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ निखळ । वीरशैवांचा धर्मग्रंथ ॥ १७ ॥ त्या ग्रंथाचा अनुवाद । मराठीत करावा सिद्घ । यालागी प्रवर्तलो मी अबुद्घ । म्हणूनि शिवा साह्य करी ॥ १८ ॥ तुझ्या कृपेने कामना सरती । होईल माझी देवा निश्चिती । ग्रंथ रचूनि माझी मती । आणि वाणी शुद्घ व्हावी ॥ १९ ॥ रेवण मरुळ एकोराम । पंडित विश्वाराध्य परम । या पंचाचार्यांस प्रणाम । माझा असो साष्टांग ॥ २० ॥ पंचपीठांवरी विद्यमान । आचार्य जे शीलसंपन्न । त्यांनाही करितो वंदन । अत्यादरपूर्वक ॥ २१ ॥ पंचपीठांत विख्यात पीठ । श्रीकाशीजंगमवाडी मठ । ज्ञानसिंहासन ज्ञानपीठ । श्रीविश्वाराध्य जगद्गुरूंचे ॥ २२ ॥ आरूढ ज्ञानसिंहासनावर । महास्वामीजी श्रीचंद्रशेखर । उगवला जैसा दिनकर । अंतराळी तेजस्वी ॥ २३ ॥ अज्ञान दूर दवडावे । स्वत्वाचे भान घडवावे । ऐसा धर्मजागर स्वभावे । महास्वामींनी आरंभिला ॥ २४ ॥ ज्ञाननिष्ठ सत्त्वशील । कीर्तिवंत करुणाबहुल । अशा आचार्यांचे पदकमल । वंदूनि मी धन्य झालो ॥ २५ ॥ जगद्गुरूंच्या आज्ञेवरून । आरंभिले ग्रंथलेखन । श्रीसिद्घान्तशिखामणी संपूर्ण । ओवीबद्घ करावा ॥ २६ ॥ संस्कृत भाषा श्रीमंत । जरी ज्ञानभाषा समर्थ । तरी तिचा कळाया अर्थ । मराठी जनांस कठीण ॥ २७ ॥ म्हणूनि वीरशैवसिद्घान्त । ओवूनिया मराठीत । सिद्घ करावा पारायणग्रंथ । जगद्गुरूंची आज्ञा ही ॥ २८ ॥ महास्वामीजींचा वरदहस्त । मम मस्तकावरी सतत । म्हणूनि प्रवर्तलो मी येथ । लेखनकामाठी कराया ॥ २९ ॥ जरी मी अल्पबुद्घी असेन । तरी त्यांच्या कृपेने तरेन । आणि होईल पूर्ण लेखन । मनी हा दृढ विश्वास ॥ ३० ॥ पेरातूनि उगवे पेर । इक्षुदंड होई थोर । तैसा ओवी-ओवीतून विस्तार । पावेल ग्रंथ हळूहळू ॥ ३१ ॥ मजला करणे प्रवृत्त । हे तर केवळ निमित्त । लिहिणारा लिहितो ग्रंथ । मी बाहुले समर्थाचे ॥ ३२ ॥ मग चिंता करू कशाला? । वृथा वागवू मीपणाला? । ज्याचे कर्तृत्व त्याला । अर्पूनि मी मुक्त होतो ॥ ३३ ॥ नमो महास्वामी पलसिद्घ । ज्यांची योगलीला अगाध । साखरखेर्डे ग्राम प्रसिद्घ । तेथे समाधिस्थ सद्गुरू ॥ ३४ ॥ अभिषिक्त त्या पट्टस्थानी । वेदान्ताचार्य श्रीसिद्घलिंग स्वामी । त्यांचा अनुग्रहीत मी । आदरे त्यांना वंदितो ॥ ३५ ॥ बसवादी शरण समस्त । ज्ञानेश्वरादी सकल संत । मन्मथ-लक्ष्मणादी शिवसंत । यांना वंदन त्रिवार ॥ ३६ ॥ कलाकवी मुक्तेश्वर । श्रीधरस्वामी नाझरेकर । सर्व कथाकवींस सादर । मनोभावे वंदितो ॥ ३७ ॥ ग्रंथकर्ते कविवर्य । श्रीशिवयोगी शिवाचार्य । भाष्यकर्ते श्रीमरितोंटदार्य । या दोघांसी वंदितो ॥ ३८ ॥ श्रीरमतेराम सद्गुरू । माझ्या मायपित्याचे श्रीगुरू । संसारसागरीचे तारू । त्यांना वंदन सादर ॥ ३९ ॥ तुम्ही श्रोते-वाचक भाविक । मर्मज्ञ आणि चिकित्सक । शुद्घान्त:करणी विवेक । जागृत तुमचा सदैव ॥ ४० ॥ ज्ञानसरोवरीचे मराळ । भक्षूनि तत्त्वमुक्ताफळ । क्रमता गूढ अंतराळ । अथकपणे अध्यात्माचे ॥ ४१ ॥ जिज्ञासेच्या सरितेकाठी । तुमची सदैव असे राहाटी । नित्य जपता ओठी । गुज शिवनामाचे ॥ ४२ ॥ भक्तिप्रेमाच्या लोटे । तुमच्या नयनी पूर दाटे । भारावूनि नेत्रपुटे । मिटती दळासारखी ॥ ४३ ॥ आप-पर ऐसा भाव । नेणेचि तुमची जाणीव । सर्वांभूती प्रेमभाव । हृदयाकाशी दाटलेला ॥ ४४ ॥ सद्ग्रंथांच्या श्रवणी । कदापि न पुरे धणी । मन आतून फुलूनी । जाय कमळासारखे ॥ ४५ ॥ असे तुम्ही प्रज्ञावंत । श्रोते-वाचक उपस्थित । मग मज उणे येथ । कशाचे जी असेल? ॥ ४६ ॥ तुमची केवळ स्नेहदृष्टी । उभवील साहित्याची सृष्टी । तरी आता कासवदृष्टी । विलोकावे मजकडे ॥ ४७ ॥ आपुले बालक म्हणून । मजला घ्यावे सांभाळून । मज अशक्य तरी लेखन । करवूनि घ्यावे सप्रेम ॥ ४८ ॥ न्यून ते करावे पुरते । अधिक ते करावे सरते । आनंदाच्या डोही पुरते । सर्वकाळ न्हावे जी ॥ ४९ ॥ द्यावे मजकडे अवधान । एकाग्र करावे अंत:करण । अद्भुत शिवसिद्घान्त श्रवण । आता पुढे करावा ॥ ५० ॥ पृथ्वीवरी नाना देश । त्यात एक भारतवर्ष । विविध धर्मांची विशेष । जन्मभूमी असे ही ॥ ५१ ॥ त्यात वीरशैवधर्म महान । आगमोक्त सनातन । त्याचे युगीयुगी स्थापन । केले पंचाचार्यांनी ॥ ५२ ॥ तोच प्राचीन इतिहास । श्रोतेहो कथितो तुम्हांस । पाशुपततंत्र-सुप्रभेदागमांस । ठेवूनिया साक्षीला ॥ ५३ ॥ वीरशैवधर्माचा हा विशेष । करिता षट्स्थलांचा प्रवास । एकाच जन्मी साधकास । मुक्ती देई सहज ॥ ५४ ॥ न पाहता नारी नर । सर्वांना मिळे समान संस्कार । जातिवर्णादी भेद समग्र । या धर्मात नसतीच ॥ ५५ ॥ साधकहृदयीची भक्ती । पाहून श्रीगुरू दीक्षा देती । वर्ण-आश्रमांपासून मुक्ती । मिळे याच धर्मात ॥ ५६ ॥ उद्घराया मानव- जाती । या धर्माची झाली उत्पत्ती । म्हणूनि सर्वांनी भक्ति-। पूर्वक हाचि आचरावा ॥ ५७ ॥ शिवाच्या पंचमुखांपासून । उत्पन्नले पंच शिवगण । रेणुक दारुक घंटाकर्ण । धेनुकर्ण नि विश्वकर्ण हे ॥ ५८ ॥ सद्योजातमुखातून । रेणुकगणाचे अवतरण । वामदेवमुखातून । उद्भवले दारुक ॥ ५९ ॥ अघोर-मुखातून घंटाकर्ण । तत्पुरुषमुखातून धेनुकर्ण । शिवाचे पाचवे मुख ईशान । तेथून विश्वकर्ण प्रकटले ॥ ६० ॥ ह्या पंच शिवगणांनी भूवर । शिवाज्ञेने घेतले अवतार । चहू युगांत केला जागर । वीरशैवधर्माचा ॥ ६१ ॥ ते कोण कोठे गेले । कोणत्या लिंगातूनि उद्भवले । हे ठाऊक व्हावे सगळे । म्हणूनि संक्षिप्त सांगतो ॥ ६२ ॥ कोण्या युगी नाम कोण । कोणते पीठ सिंहासन । क्षेत्र गोत्र सूत्र कंथा जाण । आणि दंड कोणता ॥ ६३ ॥ हे ध्यानी घेऊनि नीट । वीरशैवांनी करावे पाठ । आपुला धर्म परंपरा पीठ । असावे सर्व ठाऊक ॥ ६४ ॥ आंध्रदेशी कोल्लिपाक पुर । तेथे लिंग सोमेश्वर । त्या लिंगातूनि अवतार । रेणुक घेती युगीयुगी ॥ ६५ ॥ कृतयुगी एकाक्षर शिवाचार्य । त्रेतायुगी एकवक्त्र शिवाचार्य । द्वापरी रेणुक शिवाचार्य । कलियुगी रेवणाराध्य या नावे ॥ ६६ ॥ कर्नाटकात बाळेहोन्नूर । तेथे स्थापिले पीठ मनोहर । वीरसिंहासन गोत्र वीर । हरित्कंथा अश्वत्थदंड ॥ ६७ ॥ कर्नाटकी प्रसिद्घ श्रेष्ठ । हेच रंभापुरी पीठ । आचार्यांचे करितो स्पष्ट । कार्य ऐका सादर ॥ ६८ ॥ कृतयुगी ब्रह्मादी देवांलागून । केले नीलमणी-लिंगधारण । पंचाक्षरी महामंत्र उपदेशून । दाखविला मोक्षमार्ग ॥ ६९ ॥ त्रेतायुगी कौशिकादी ऋषींना । मनू-यक्ष-गंधर्व-किन्नरांना । करविली रत्नमय लिंगधारणा । केला पंचाक्षर मंत्रोपदेश ॥ ७० ॥ द्वापरी महर्षी अगस्त्यास । केला पडविडी-सूत्रोपदेश । त्याचि सूत्राचा विस्तार विशेष । श्रीसिद्घान्तशिखामणी ग्रंथ हा ॥ ७१ ॥ रेवणाराध्य नामे कलियुगात । अवतार घेऊनि शिवाद्वैत । उपदेशिले उद्घरिले अनंत । शिवभक्त वीरत्व देऊनी ॥ ७२ ॥ रेवणसिद्घ पर्यायनाम । जनांस बोधिले शिवागम । ऐसे वीरपीठाचे महिमान । ध्यानी धरा श्रोतेहो ॥ ७३ ॥ क्षिप्रातीरी मनोहर । वटक्षेत्र श्रीसिद्घेश्वर । त्या लिंगातूनि अवतार । दारुक घेती युगीयुगी ॥ ७४ ॥ त्यांची नामे ऐका सादर । कृतयुगात द्य्वक्षर । त्रेतायुगात द्विवक्त्र । द्वापरयुगी दारुक ॥ ७५ ॥ कलियुगी मरुळाराध्य अभिधान । स्थापिले सद्घर्मसिंहासन । मध्यप्रांती उज्जयिनी महान । तेथे पीठ विराजित ॥ ७६ ॥ नंदीगोत्र पलाशदंड करी । कंथा रक्तवर्ण साजिरी । ब्रह्मादी देवांस कृतयुगांतरी । लिंगधारणा करविली ॥ ७७ ॥ मंत्र पंचाक्षरी उपदेशिला । त्यांना मोक्षमार्ग दाविला । त्रेतायुगी कश्यपादी ऋषिसमूहाला । गंधर्वादींना उपदेशिले ॥ ७८ ॥ दधीचि ऋषीस द्वापरी पवित्र । उपदेशिले वृष्टि-सूत्र । कलियुगी शिवाद्वैत सर्वत्र । बोधूनि सद्घर्म जागविला ॥ ७९ ॥ कालांतरे कर्नाटकात । बल्लारीनिकट उज्जयिनीत । पीठ झाले स्थलांतरित । मध्यप्रांतामधूनी ॥ ८० ॥ क्षेत्र पवित्र द्राक्षाराम जाण । तेथे रामनाथलिंगातून । युगीयुगी घंटाकर्ण । योगबळे अवतरती ॥ ८१ ॥ त्र्यक्षर नाम कृतयुगात । त्रिवक्त्र नाम त्रेतायुगात । घंटाकर्ण द्वापरात । कलीत एकोरामाराध्य ॥ ८२ ॥ हिमालयी केदारक्षेत्रात । स्थापिले वैराग्यपीठ निवांत । तेचि वैराग्यसिंहासन सांप्रत । उखीमठात स्थित असे ॥ ८३ ॥ भृंगीगोत्र वेणुदंड करी । कंथा नीलवर्ण साजिरी । उपदेशिला पंचाक्षरी । कृतयुगी ब्रह्मादींना ॥ ८४ ॥ वसिष्ठादी ऋषिगणा । केली त्रेतायुगी लिंगधारणा । यक्षगंधर्वकिन्नरांना । उपदेशिला महामंत्र ॥ ८५ ॥ द्वापरी महर्षी व्यासास । केला लम्बन-सूत्रोपदेश । उजळिला शिवाद्वैतप्रकाश । कलियुगी सर्वत्र ॥ ८६ ॥ अज्ञ जनांस बोधिले । मनी वैराग्य बिंबविले । कार्य संपता विलीन झाले । रामनाथलिंगात ॥ ८७ ॥ आंध्रप्रदेशात श्रीशैल । क्षेत्र पुरातन विशाल । तेथे शिव नांदतो प्रेमळ । मल्लिकार्जुन या नामे ॥ ८८ ॥ युगीयुगी त्या लिंगातून । अवतीर्ण होती धेनुकर्ण । कृतयुगी चतुरक्षर अभिधान । त्रेतात होते चतुर्वक्त्र ॥ ८९ ॥ द्वापरात धेनुकर्ण । कलीत पंडिताराध्य अभिधान । जागविली मनामनांतून । सूर्यासम शिवभक्ती ॥ ९० ॥ स्थापिले पीठ श्रीशैलात । तेचि श्रीशैलपीठ सर्वज्ञात । सूर्यसिंहासन विख्यात । आहे त्याच पीठा- मध्ये ॥ ९१ ॥ न्यग्रोधदंड वृषभगोत्र । कंथा धवलवर्ण पवित्र । कृतयुगी पंचाक्षरी मंत्र । उपदेशिला ब्रह्मादींना ॥ ९२ ॥ त्रेतायुगी ऋषी गंधर्व । लिंगधारी केले सर्व । प्रकटला तेजस्वी सूर्य । जणू आचार्यरूपाने ॥ ९३ ॥ सानंद मुनीस द्वापरी पवित्र । उपदेशिले मुक्तागुच्छ-सूत्र । आणि कलियुगात सर्वत्र । उद्घरिले जनलोक ॥ ९४ ॥ परमपावन काशीक्षेत्र । आनंदकानन शिवक्षेत्र । विश्वेश्वर लिंगरूपे पवित्र । तेथे नांदतो शंकर ॥ ९५ ॥ विश्वेश्वर ज्योतिर्लिंगातून । उद्भवले युगीयुगी विश्वकर्ण । कृतयुगी पंचाक्षर अभिधान । पंचवक्त्र त्रेतायुगी ॥ ९६ ॥ विश्वकर्ण द्वापरात । विश्वाराध्य कलियुगात । या नामे झाले विख्यात । चहुयुगी विश्वकर्ण ॥ ९७ ॥ काशीक्षेत्री जंगमवाडी मठ । तेथे स्थापिले ज्ञानपीठ । ज्ञानसिंहासन नामे श्रेष्ठ । तेचि आहे विख्यात ॥ ९८ ॥ स्कंदगोत्र बिल्वदंड करी । कंथा पीतवर्ण साजिरी । चतुर्युगांत पंचाक्षरी । उपदेशिला महामंत्र ॥ ९९ ॥ कृतयुगी ब्रह्मादी देवगणा । नीलरत्नांची लिंगधारणा । करवून, उपदेशून मंत्र जाणा । दाखविला मोक्षमार्ग ॥ १०० ॥ त्रेतायुगी ऋषिगण-। यक्ष-गंधर्व-किन्नरांसी जाण । रत्नलिंग देऊन । उपदेशिला महामंत्र ॥ १०१ ॥ द्वापरी महर्षी दुर्वासास । केला पंचवर्ण-महासूत्रोपदेश । कलियुगी सर्व मानवांस । ज्ञान देऊनि उद्घरिले ॥ १०२ ॥ वीरवृत्ती सद्घर्मपालन । वैराग्य तेजवृत्ती ज्ञान । अशा पंचगुणांची महान । देती शिकवण पंचपीठे ॥ १०३ ॥ उद्भवले ज्या लिंगातून । त्याच लिंगात होती विलीन । आपुले कार्य पूर्ण करून । पंचाचार्य जगद्गुरू ॥ १०४ ॥ वीरशैव विद्यापरंपरा । सांगतो श्रोतेहो अवधारा । आदिविद्यागुरू शंकरा-। पासूनि तिचा उगम ॥ १०५ ॥ शिवाने कथिले शिवाद्वैत । प्रथम पार्वती-शिवगणांप्रत । आचार्यरूपे होऊनि अवतरित । शिवगणे कथिले ऋषींना ॥ १०६ ॥ पंचाचार्यांनी पाच सूत्रांत । ऋषींस कथिला सिद्घान्त । तोचि ऋषींनी विवरूनि ग्रंथांत । दिला मानवमात्रासी ॥ १०७ ॥ ज्ञानपरंपरा ही जाण । अद्यापही असे अक्षुण्ण । आचार्यांकडूनि मिळे ज्ञान । पट्टाधिकारी-जंगमांस ॥ १०८ ॥ त्यांच्याकडून भक्तांप्रत । तेच शिवज्ञान होते प्राप्त । ऐसा ज्ञानप्रवाह अविरत । वाहत आला युगीयुगी ॥ १०९ ॥ विविध प्रांती झाले संत । त्यांनी ज्ञानौघ केला समर्थ । रचूनि आपुल्या भाषेत ग्रंथ । ज्ञान दिले लोकांना ॥ ११० ॥ बसवेश्वरादी शिवशरण । त्यांनी कन्नड वचने रचून । हेचि शिवाद्वैतज्ञान । नेले लोकांपर्यंत ॥ १११ ॥ श्रीपती आदी पंडितत्रयांनी । संस्कृत-तेलुगू ग्रंथांमधूनी । पाल्कुरिकी सोमनाथादी कवींनी । दिले हाती लोकांच्या ॥ ११२ ॥ महाराष्ट्रात मन्मथस्वामींनी । शांतलिंग-लक्ष्मणादींनी । हेचि ज्ञान मराठीतूनी । देऊनि लोका धैर्य दिले ॥ ११३ ॥ महाराष्ट्रात शिवाचार्य । अद्यापीही करिती कार्य । भजन कीर्तन शिवनामसप्ताह । अव्याहत चालती ॥ ११४ ॥ संस्कृतासह लोकभाषांत । शिवज्ञानप्रवाह अखंडित । असा आला आणि प्रवाहित । पुढेही होत राहिला ॥ ११५ ॥ आता श्रोतेहो सावध होऊन । करावा शिवसिद्घान्त श्रवण । जे ऐकता जन्ममरण-। भयापासून मिळे मुक्ती ॥ ११६ ॥ वेद म्हणजे निगम जाण । ते जन्मले शिव-नि:श्वासातून । जे प्रकटले शिव-वाणीतून । ते आगम म्हणविले ॥ ११७ ॥ ऐसे अठ्ठावीस शिवागम पूर्ण । त्यांची नामे भिन्न भिन्न । ती करितो आता कथन । जिज्ञासू श्रोत्यां- कारणे ॥ ११८ ॥ कामिक योगज चिन्त्यागम । कारण अजित दीप्तागम । सूक्ष्म अंशुमान सहस्रागम । सुप्रभेद नि:श्वास ॥ ११९ ॥ अनल वीर विजय । मकुट विमल स्वायंभुव । बिम्ब प्रोद्गीत रौरव । ललित आणि सिद्घागम ॥ १२० ॥ पारमेश्वर चंद्रज्ञान । शर्वोक्त आणि संतान । किरण आणि वातुल जाण । हे अठ्ठावीस शिवागम ॥ १२१ ॥ शिवागमी उत्तरभागात । प्रतिपाद्य षट्स्थलसिद्घान्त । तोचि विवरिला या ग्रंथात । शिवयोगी शिवाचार्यांनी ॥ १२२ ॥ रेणुकाचार्य-अगस्त्यमुनी । यांच्या तात्त्विक संवादातूनी । उत्पन्नला श्रीसिद्घान्तशिखामणी । म्हणूनि म्हणती ‘रेणुकगीता’ ॥ १२३ ॥ गुरु-शिष्याचा संवाद । यात साठला पूर्णबोध । त्याचा श्रोतेहो आस्वाद । घ्यावा हळुवार मनाने ॥ १२४ ॥ तरी आता सावध सावध । चित्त श्रवणी करा बद्घ । जन्मी एका मुक्तिपद-। दाता ग्रंथ ऐकावा ॥ १२५ ॥
शिवस्तुती
त्रैलोक्यसंपदाले‘यसमुल्लेखनभित्तये । सच्चिदानंदरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः ॥ १ ॥
स्वर्ग मृत्यू पाताळ । हे त्रैलोक्य अति विशाल । त्यात नांदती सकळ । चर अचर सर्वही ॥ १२६ ॥ त्रैलोक्याचे हे वैभव । जरी रेखाटावे सर्व । तरी त्यास एकमेव । आधारभिंत शिवचि ॥ १२७ ॥ असा सच्चिदानंदरूप । परशिव ब्रह्मरूप । नत होऊनि सुखरूप । वंदितो मी अत्यादरे ॥ १२८ ॥
ब्रह्मेति व्यपदेशस्य विषयं यं प्रचक्षते । वेदान्तिनो जगन्मूलं तं नमामि परं शिवम् ॥ २ ॥
यस्योर्मिबुद्बुदाभासः षट्त्रिंशत्तत्त्वसंचयः । निर्मलं शिवनामानं तं वंदे चिन्महोदधिम् ॥ ३ ॥
ज्यापासूनि विश्व झाले निर्माण । वेदान्ती म्हणती ब्रह्म पूर्ण । जे जगताचे मूलकारण । त्या परशिवास नमस्कार ॥ १२९ ॥ शिवापासूनि भूमीपर्यंत । विश्व छत्तीस तत्त्वयुक्त । शुद्घ शुद्घाशुद्घ अशुद्घ त्यात । तत्त्वे तीन प्रकारची ॥ १३० ॥ ही छत्तीस तत्त्वे सारी । लाटा-तरंग-बुद्बुदापरी । परशिव-चैतन्यसागरी । विहरती सहजभावे ॥ १३१ ॥ आणव मायीय कार्मिक । या त्रिमलांविरहित देख । निर्मल चित्सागर शिव एक । त्यास माझा नमस्कार ॥ १३२ ॥
यद्भासा भासते विश्वं यत्सुखेनानुमोदते । नमस्तस्मै गुणातीतविभवाय परात्मने ॥ ४ ॥
सदाशिवमुखाशेषतत्त्वोन्मेषविधायिने । निष्कलंकस्वभावाय नमः शांताय शंभवे ॥ ५ ॥
जो प्रकाशता विश्व उजळत । जो तुष्टता विश्व तुष्टत । वैभवसंपन्न त्रिगुणरहित । त्या परशिवास नमस्कार ॥ १३३ ॥ सदाशिवापासूनि चौतीस । सर्व तत्त्वांचा जो करी विकास । त्या निर्मल शांतस्वरूप शंभूस । नमस्कार नमस्कार ॥ १३४ ॥
स्वेच्छाविग्रहयुक्ताय स्वेच्छावर्तनवर्तिने । स्वेच्छाकृतत्रिलोकाय नमः सांबाय शंभवे ॥ ६ ॥
यत्र विश्राम्यतीशत्वं स्वाभाविकमनुत्तमम् । नमस्तस्मै महेशाय महादेवाय शूलिने ॥ ७ ॥
स्वेच्छेने करी देहधारण । इच्छाशक्तीने विश्वसृजन । जो करी स्वेच्छावर्तन । त्या शिवा नमितो अंबेसह ॥ १३५ ॥ जो श्रेष्ठ विश्वस्वामी । त्रिशूलधारी अंतर्यामी । त्या महेश्वर महादेवास मी । वंदिले अति आदरे ॥ १३६ ॥
शक्तिस्तुती
यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः । तां धर्मचारिणीं शंभोः प्रणमामि परां शिवाम् ॥ ८ ॥
यया महेश्वरः शंभुर्नामरूपादिसंयुतः । तस्यै मायास्वरूपायै नमः परमशक्तये ॥ ९ ॥
जी परशिवाशी अभिन्न । पंडित मानिती विश्वकारण । त्या परशिवेस वंदन । जी शिवाची धर्मपत्नी ॥ १३७ ॥ अनाम अरूप महेश्वर । जिच्यामुळे झाला नामरूपाकार । त्या मायाशक्तीस नमस्कार । माझा असो सदैव ॥ १३८ ॥
शिवाद्यादिसमुत्पन्नशान्त्यतीतपरोत्तराम् । मातरं तां समस्तानां वंदे शिवकरीं शिवाम् ॥ १० ॥
इच्छाज्ञानादिरूपेण या शंभोर्विश्वभाविनी । वंदे तां परमानंदप्रबोधलहरीं शिवाम् ॥ ११ ॥
अमृतार्थं प्रपन्नानां या सुविद्याप्रदायिनी । अहर्निशमहं वंदे तामीशानमनोरमाम् ॥ १२ ॥
प्रथम परशिवापासून । प्रकटली शान्त्यतीतोत्तरा कला जाण । जी श्रेष्ठ त्या कलेहून । माता सहा कलांची ॥ १३९ ॥ अशी मातृरूपी कल्याणकारी । सर्वमंगला भुवनेश्वरी । जी शिवाची हृदयेश्वरी । त्या शिवेला नमस्कार ॥ १४० ॥ शिवाची धर्मचारिणी । इच्छा-ज्ञान-क्रियारूपिणी । परमानंदबोध-प्रवाहिनी । विश्वप्रकाशिनी तिला नमू ॥ १४१ ॥ अमृतत्व व्हावे प्राप्त । म्हणूनि जे शरणागत । त्यांना शिवजीवैक्याची देत । विद्या जी कृपाळुत्वे ॥ १४२ ॥ ती शिवाची मनमोहिनी । अमृतत्वप्रदायिनी । ती नमितो निशिदिनी । मी भक्तिभावनेने ॥ १४३ ॥
ग्रंं‘थकार-वंशवर्णन
कश्चिदाचारसिद्घानामग्रणीः शिवयोगिनाम् । शिवयोगीति विख्यातः शिवज्ञानमहोदधिः ॥ १३ ॥
शिवभक्तिसुधासिंधुजृम्भणामलचंद्रिका । भारती यस्य विदधे प्रायः कुवलयोत्सवम् ॥ १४ ॥
शिवयोगी शिवाचार्य थोर । ज्यांनी रचिला ग्रंथ सुंदर । शिवागमांचे सर्व सार । श्रीसिद्घान्त-शिखामणीत आणिले ॥ १४४ ॥ त्यांच्या वंशी कोण कोण । विद्वान योगी गेले होऊन । तेचि करितो आता कथन । मर्मज्ञ श्रोत्यांकारणे ॥ १४५ ॥ शिवज्ञानाचा महासागर । अंगी बाणला सदाचार । शिवयोग्यांत अग्रेसर । ‘शिवयोगी’ ख्यात नामे ॥ १४६ ॥ त्यांची वाणी रसवंती । ऐकता श्रोतृमनी शिवभक्ती । उचंबळे जैसी येई भरती । सागरी दिनी पौर्णिमेच्या ॥ १४७ ॥ चांदणरात्री शीतल । जैसे उमले चंद्रकमल । तैसी मने होती प्रफुल्ल । त्यांना सामोरी पाहता ॥ १४८ ॥
तस्य वंशे समुत्पन्नो मुक्तामणिरिवामलः । मुद्ददेवाभिधाचार्यो मूर्धन्यः शिवयोगिनाम् ॥ १५ ॥
मुद्दानात्सर्वजन्तूनां प्रणतानां प्रबोधतः । मुद्ददेवेति विख्याता समाख्या यस्य विश्रुता ॥ १६ ॥
त्या शिवयोग्याच्या वंशात । जे श्रेष्ठ शिवयोग्यांत । ते जन्मले ‘मुद्ददेव’ ज्ञानवंत । आचार्य मोत्या-सारखे ॥ १४९ ॥ शरणागत मानवांस । करूनिया ज्ञानोपदेश । ते देती बहू संतोष । म्हणूनि नाव ‘मुद्ददेव’ ॥ १५० ॥
तस्यासीन्नन्दनः शांतः सिद्घनाथाभिधः शुचिः । शिवसिद्घान्तनिर्णेता शिवाचार्यः शिवात्मकः ॥ १७ ॥
वीरशैवशिखारत्नं विशिष्टाचारसंपदम् । शिवज्ञानमहासिंधुं यं प्रशंसन्ति देशिकाः ॥ १८ ॥
त्या मुद्ददेवांचा सुपुत्र । ‘सिद्घनाथ’ नामे पवित्र । राग-द्वेष अणुमात्र । त्यांच्या चित्तास शिवेना ॥ १५१ ॥ ते प्रत्यक्ष शिवरूप । शिवाद्वैताचे ज्ञानदीप । शिवागमांचा साक्षेप-। पूर्वक करिती निर्णय ॥ १५२ ॥ पती पशू पाश पदार्थ तीन । क्रिया चर्चा योग ज्ञान । हे आगमिक चतुष्पाद जाण । दाखविती विवरूनी ॥ १५३ ॥ वीरशैवांचा मुकुटमणी । आचारसंपन्न शिवज्ञानी । ऐसी प्रशंसा सत्त्वगुणी । करिती अन्य आचार्य ॥ १५४ ॥
यस्याचार्यकुलाज्जाता सतामाचारमातृका । शिवभक्तिः स्थिरा यस्मिन् जज्ञे विगतविप्लवा ॥ १९ ॥
तस्य वीरशिवाचार्यशिखारत्नस्य नंदनः । अभवच्छिवयोगीति सिंधोरिव सुधाकरः ॥ २० ॥
चिदानंदपराकाशशिवानुभवयोगतः । शिवयोगीति नामोक्तिर्यस्य याथार्थ्ययोगिनी ॥ २१ ॥
ज्या आचार्यकुलातून । सज्जनांचे आचार झाले उत्पन्न । त्या पवित्र कुलात जनन । झाले सिद्घनाथांचे ॥ १५५ ॥ म्हणूनि निर्दोष प्रशांत । निर्मल शिवभक्ती स्थित । सिद्घनाथांच्या हृदयात । सदैव होती जागती ॥ १५६ ॥ त्या सिद्घनाथांचा सुत । ‘शिवयोगी’ नामे ख्यात । पित्यास अतीव आनंद देत । जैसा चंद्र सागरासी ॥ १५७ ॥ शिवसाक्षात्कारामुळे । त्यांचे बाह्याभ्यंतर उजळे । म्हणूनि सार्थकत्व पावले । ‘शिवयोगी’ नाम ते ॥ १५८ ॥
शिवागमपरिज्ञानपरिपाकसुगंधिना । यदीयकीर्तिपुष्पेण वासितं हरितां मुखम् ॥ २२ ॥
येन रक्षावती जाता शिवभक्तिः सनातनी । बौद्घादिप्रतिसिद्घान्तमहाध्वांतांशुमालिना ॥ २३ ॥
स महावीरशैवानां धर्ममार्गप्रवर्तकः । शिवतत्त्वपरिज्ञानचंद्रिकावृतचंद्रमाः ॥ २४ ॥
शिवागमांचे पूर्ण ज्ञाते । ऐसे वाखाणी जग त्याते । कीर्तिसुगंधे घमघमे ते । अवघे विश्व त्यांच्या हो ॥ १५९ ॥ नास्तिक प्रतिसिद्घान्तांस । खंडूनि रक्षिले शिवाचारास । जैसा दिनकर अंधारास । दवडी आपुल्या तेजाने ॥ १६० ॥ श्रेष्ठ वीरशैवांलागून । केले धर्ममार्गप्रवर्तन । दूर दवडिले अज्ञान । मनांतूनि लोकांच्या ॥ १६१ ॥ चंद्र शोभे चांदण्याने । तैसे शिवज्ञानचंद्रिकेने । ‘शिवयोगी’ शोभती मने । आल्हादवीत भक्तांची ॥ १६२ ॥
आलोक्य शैवतंत्राणि कामिकाद्यानि सादरम् । वातुलान्तानि शैवानि पुराणान्यखिलानि तु ॥ २५ ॥
वेदमार्गाविरोधेन विशिष्टाचारसिद्घये । असन्मार्गनिरासाय प्रमोदाय विवेकिनाम् ॥ २६ ॥
कामिकापासूनि वातुलागम । ऐसे अठ्ठावीस शिवागम । आणिक शिवपुराणे परम । अभ्यासिली साक्षेपे ॥ १६३ ॥ वेदांस न आणिता बाध । शिवाचार केला सिद्घ । कुमार्गासी करूनि रोध । विवेकी जनांस तुष्ट केले ॥ १६४ ॥
सर्वस्वं वीरशैवानां सकलार्थप्रकाशनम् । अस्पृष्टमखिलैर्दोषैरादृतं शुद्घमानसैः ॥ २७ ॥
तेष्वागमेषु सर्वेषु पुराणेष्वखिलेषु च । पुरा देवेन कथितं देव्यै तन्नन्दनाय च ॥ २८ ॥
तत्संप्रदायसिद्घेन रेणुकेन महात्मना । गणेश्वरेण कथितमगस्त्याय पुनः क्षितौ ॥ २९ ॥
वीरशैवमहातंत्रमेकोत्तरशतस्थलम् । अनुग्रहाय लोकानामभ्यधात् सुधियां वरः ॥ ३० ॥
जो वीरशैवांचे सार समस्त । जो सर्वदोषविरहित । ज्यास शिरी धारण करीत । शुद्घान्त:करणी शिवयोगी ॥ १६५ ॥ शिवागम-पुराणांत । विवरिला जो शिवसिद्घान्त । तो पार्वती-षडाननांप्रत । पूर्वी कथिला शिवाने ॥ १६६ ॥ रेणुकाचार्यांनी अगस्तीला । षट्स्थलसिद्घान्त कथिला । पिंडापासूनि ज्ञानशून्यस्थला-। पर्यंत एकशे एक स्थले ॥ १६७ ॥ ते वीरशैव महातंत्र । जवळी न ठेविता अणुमात्र । शिवयोगी शिवाचार्यांनी सर्वत्र । केले प्रकट जनांसाठी ॥ १६८ ॥
सर्वेषां शैवतंत्राणामुत्तरत्वान्निरुत्तरम् । नाम्ना प्रतीयते लोके यत्सिद्घान्तशिखामणिः ॥ ३१ ॥
अनुगतसकलार्थे शैवतंत्रैः समस्तैः
प्रकटितशिवबोधाद्वैतभावप्रसादे ।
विदधतु मतिमस्मिन् वीरशैवा विशिष्टाः
पशुपतिमतसारे पंडितश्लाघनीये ॥ ३२ ॥
हा अपूर्व षट्स्थलसिद्घान्त । शैवतंत्राच्या उत्तरभागात । प्रतिपादिला सर्व सिद्घान्तांत । शिरोभागी विराजिला ॥ १६९ ॥ ‘श्रीसिद्घान्तशिखामणी’ म्हणून । या ग्रंथाचे नामाभिधान । सर्व ग्रंथांत श्रेष्ठ संपूर्ण । ग्रंथ असे हा तात्त्विक ॥ १७० ॥ शैवतंत्रांचा रहस्यार्थ । या ग्रंथी झाला अभिव्यक्त । यात प्रकटले शिवाद्वैत । जे आदरिले विद्वज्जनी ॥ १७१ ॥ पाशुपतमताचे सार । या ग्रंथात साठले मधुर । सर्व वीरशैवांनी अत्यादर-। पूर्वक हा अभ्यासावा ॥ १७२ ॥ याचे करिता अध्ययन । आणि करिता आचरण । तरी जन्ममृत्यूचे ग्रहण । जन्मी एका सुटेल ॥ १७३ ॥ जो करील शिवभक्ती । त्यास एका जन्मीच मुक्ती । गर्जे आगमांची उक्ती । ‘जन्म हा अखेरचा’ ॥ १७४ ॥ आता पुढील कथाभाग । मनी ठेवूनि अनुराग । जैसे भ्रमर चुंबिती पराग । तैसा हळू अनुभवावा ॥ १७५ ॥ हा ग्रंथ अति मधुर । वीरशैवधर्मबीजांकुर । वीरशैवांनी पूर्ण तत्पर । असावे अभ्यासी साधनी ॥ १७६ ॥ श्रीसिद्घान्त-शिखामणिप्रसाद । यात साठला पूर्ण शिवबोध । भाविक जिज्ञासू भक्तांनी स्वाद । चाखूनि व्हावे कृतार्थ ॥ १७७ ॥ शिवस्वरूप जगद्गुरुवर । श्रीकाशीमहास्वामीजी चंद्रशेखर । त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर । रचितो शेषनारायण ॥ १७८ ॥ श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत । सद्भावे परिसोत शिवभक्त । होतील मने भक्तियुक्त । प्रथमोऽध्याय पूर्ण हा ॥ १७९ ॥
॥ ॐ तत्सदिति श्रीशिवगीतेषु सिद्घान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे
वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगिशिवाचार्यविरचिते श्रीसिद्घान्तशिखामणौ
अनुक्रमवर्णनो नाम प्रथमः परिच्छेदः ॥
॥ श्रीशिवार्पणमस्तु ॥