Shri Siddhantha Shikhamani.com

Veerashaiva Dharma Granth

Chapter 6

अध्याय सहावा


श्रीगणेशाय नमः । श्रीजगद्गुरु पंचाक्षर शिवाचार्याय नमः  ॥  ॐ शिवाय नमः नीललोहिताय । शूलपाणये नमः शंकराय । विष्णुवल्लभाय नमः शिपिविष्टाय । अंबिकानाथाय नमः खट्वांगिने  ॥ १ ॥  शिवा तुझ्या इच्छेवाचून । तृणाचेही न हाले पान । माझे हे ग‘ंथलेखन । तुझ्या कृपेने चाललेले  ॥ २ ॥  बालकाचा धरूनि हात । अक्षरे लिहवितो पंडित । त्याच अनुभवे मी कृतार्थ । जहालो लेखन  करिताना  ॥ ३ ॥  श्रोतेहो भक्तस्थलातील । पिंड पिंडज्ञानस्थल  । आणि संसारहेयस्थल  । यांचे निरूपण ऐकिले  ॥ ४ ॥  भक्तस्थलातील गुरुकारुण्यस्थल । आणि लिंगधारणस्थल । अगस्तीस आता निरूपतील । जगद्गुरू रेणुकाचार्य  ॥ ५ ॥  गुरू लिंग जंगम । प्रसाद पादोदक भस्म । रुद्राक्ष मंत्र यांवरी परम । होईल विवरण यापुढे  ॥ ६ ॥  हे अष्टविषय म्हणाल कोण । ते वीरशैवांचे अष्टावरण । त्यावरी स्वतंत्र विवेचन । केले अन्य ग‘ंथांत  ॥ ७ ॥  अष्टावरण म्हणजे काय । त्याचाही असावा परिचय । म्हणूनि कथितो श्रोत्यांस्तव । आता संक्षिप्त रूपाने  ॥ ८ ॥  झाकणे आणि घालणे कुंपण । हे ‘आवरण’ शब्दाचे अर्थ दोन । वस्त्रे करूनि परिधान । मनुष्य झाकतो शरीर  ॥ ९ ॥  थंडीवार्‍यापासूनि स्वभावे । आपुल्या शरीरासी रक्षावे । यास्तव घालितो जुने नवे । कपडे माणूस अंगावरी  ॥ १० ॥  कुंपण घालूनि शेतास । रक्षितो शेतकरी पिकास । हे नित्य येई अनुभवास । अवतीभोवती पाहता  ॥ ११ ॥           तैसीच आवरणे  अष्ट । ज्या असती प्रवृत्ती अनिष्ट । त्यापासूनि शिवाचारनिष्ठ । भक्तांचे करिती          रक्षण  ॥ १२ ॥  काम क‘ोध मद मत्सर । लोभ मोह हे विकार । भक्तासी ग‘ासून छळती ङ्गार । धर्माचरण करिताना  ॥ १३ ॥  अन्यही दुष्ट मनोवृत्ती । शिवभक्ताचा अंत पाहती । त्या वृत्तींपासूनि वाचविती । अष्ट आवरणे भक्ताला  ॥ १४ ॥  योद्घा उतरे रणांगणात । अंगावरी घालूनि चिलखत । मग झेलतो शस्त्राघात । सहजपणे शत्रूंचे  ॥ १५ ॥  तैसेच अरिष्टांपासून । शिवभक्तांचे करिती रक्षण । ही आठ आवरणे म्हणून । त्यांस म्हणती रक्षाकवच  ॥ १६ ॥  ‘साधकाची अंगे’ ऐसे । अष्टावरणासी नाव  असे । शरीरव्यापार चालती जैसे । साहाय्याने अंगांच्या  ॥ १७ ॥  ‘अंग’ म्हणजे अवयव । हस्त-पाद-नेत्रादी सर्व । त्यांच्याद्वारेच करितो जीव । सर्व व्यवहार आपुला  ॥ १८ ॥  तैसे साधकाच्या परमार्थ-। व्यवहारात होती साहाय्यभूत । परमार्थ चाले सुरळीत । म्हणूनि अंगे ही साधकाची  ॥ १९ ॥  गुरु-लिंगजंगमादी अष्ट । जी आधी उल्लेखिली स्पष्ट । तीच अष्टावरणे इष्ट । असती शिवभक्तासी  ॥ २० ॥  गुरू लिंग जंगम जाण । ही पूजनीय आवरणे तीन । विभूती रुद्राक्ष मंत्र पूर्ण । ही पूजेची साधने  ॥ २१ ॥  पादोदक प्रसाद दोन । ही पूजेची ङ्गळे पूर्ण । ऐसे हे अष्टावरण । ध्यानी धरावे सुस्पष्ट  ॥ २२ ॥  देहधारी गुरू जाण । तो जाणा स्थूल आवरण । त्याने उपदेशिले जे ज्ञान । ते सूक्ष्म आवरण जाणावे  ॥ २३ ॥  देहावरील इष्टलिंग । ते स्थूल, परि प्राणलिंग । आणि अंतरातील भावलिंग । हे सूक्ष्म आवरण  ॥ २४ ॥  शिवयोगी जंगम जाण । हे असे स्थूल आवरण । त्याने उपदेशिले जे तत्त्वज्ञान । ते सूक्ष्म आवरण जाणावे  ॥ २५ ॥  शरीरावरील विभूती । ती स्थूल, परंतु चित्ती । शिवचिंतनी अखंड वृत्ती । ते सूक्ष्म आवरण  ॥ २६ ॥  रुद्राक्ष रुळे देहावरी । ते स्थूल, परि सर्व जीवमात्री । समभाव पाहणे नेत्री । हे सूक्ष्म रुद्राक्षधारण  ॥ २७ ॥  जपणे पंचाक्षर मंत्र । हे स्थूल, परि अंतरात पवित्र । शिवजीवैक्य ज्ञान हे मात्र । असे सूक्ष्म आवरण  ॥ २८ ॥  गुरु-लिंग-जंगमांच्या पादपूजेत । जे प्राप्त होते पवित्र तीर्थ । ते स्थूल, परि गुरुशिष्यैक्यज्ञान प्राप्त । ते सूक्ष्म जाणावे  ॥ २९ ॥  गुरु-लिंगादीचे अवशिष्ट अन्न । तोचि स्थूल प्रसाद जाण । त्याने मन जे होई प्रसन्न । ते सूक्ष्म आवरण जाणावे  ॥ ३० ॥  ऐशापरी स्थूल सूक्ष्म जाण । असे द्विविध अष्टावरण । होतो भक्ताचा प्रवास पूर्ण । स्थूलाकडूनि सूक्ष्माकडे  ॥ ३१ ॥  यातील स्थल गुरुकारुण्य । गुरू हे असे एक आवरण । यालागी केले विवेचन । आता ऐका गुरुलक्षणे  ॥ ३२ ॥
दीक्षागुरुकारुण्यस्थल - (४)
ततो विवेकसम्पन्नो विरागी शुद्घमानसः । जिज्ञासुः सर्वसंसारदोषध्वंसकरं शिवम्  ॥ १ ॥
उपैति लोकवि‘यातं लोभमोहविवर्जितम् । आत्मतत्त्वविचारज्ञं विमुक्तविषयभ‘मम्  ॥ २ ॥
शिवसिद्घान्ततत्त्वज्ञं छिन्नसन्देहविभ‘मम् । सर्वतन्त्रप्रयोगज्ञं धार्मिकं सत्यवादिनम्  ॥ ३ ॥
कुलक‘मागताचारं कुमार्गाचारवर्जितम् । शिवध्यानपरं शान्तं शिवतत्त्वविवेकिनम्  ॥ ४ ॥
भस्मोद्घूलननिष्णातं भस्मतत्त्वविवेकिनम् । त्रिपुंड्रधारणोत्कण्ठं धृतरुद्राक्षमालिकम्  ॥ ५ ॥
लिंगधारणसंयुक्तं लिंगपूजापरायणम् । लिंगांगयोगतत्त्वज्ञं निरूढाद्वैतवासनम्  ॥ ६ ॥
लिंगांगस्थलभेदज्ञं श्रीगुरुं शिववादिनम् ।
गुरुकृपेविण काही । भक्तास तरणोपाय नाही । गुरुकृपेसाठी देही । योग्यता असावी लागते  ॥ ३३ ॥  आत्म-अनात्मविचार । नित्य-अनित्यवस्तुविचार । याचे ज्ञान समग‘ । त्याच्याजवळी पाहिजे  ॥ ३४ ॥  कोणती वस्तू नित्य चेतन । कोणती अनित्य अचेतन । याचा निर्णय त्वरित जाण । बुद्घीने घ्यावा लागतो  ॥ ३५ ॥  संसाराविषयी वैराग्य पूर्ण । मनी असावे दृढ बिंबून । असावे शुद्घ अंत:करण । नष्ट होऊनि मनोमळ  ॥ ३६ ॥  विशुद्घ अंत:करणात । आत्म्याचे प्रतिबिंब त्वरित । पडे जैसे स्वच्छ   दर्पणात । बिंब दिसे सुस्पष्ट  ॥ ३७ ॥  ज्ञानप्राप्तीची इच्छा उत्कट । हृदयी असावी सदा तेवत । ऐशा जिज्ञासू शिष्याप्रत । लाभे पूर्ण गुरुकृपा  ॥ ३८ ॥  विवेकसंपन्नता वैराग्य पूर्ण । जिज्ञासा शुद्घ अंत:-करण । हे ज्याच्याठायी चार गुण । तो पात्र गुरुकृपेसाठी  ॥ ३९ ॥  या गुणांनी जो परिपूर्ण । तो संसारसुख अनित्य जाणून । संसारासी हेय मानून । वर्तत असे जगात  ॥ ४० ॥  जो संसारदोष-ध्वंसकर । त्या परशिवाचा करी विचार । सद्गुरूसी शरण रिघे सत्वर । जाणाया महा-       लिंगासी  ॥ ४१ ॥  तो श्रीगुरू कैसा असावा । ते श्रवण करी कलशोद्भवा । तो लोकप्रसिद्घ मुुक्त असावा । लोभमोहापासूनी  ॥ ४२ ॥  आत्मतत्त्वाचा चिंतक पूर्ण । त्यास असावे यथार्थ ज्ञान । विषयसुखाच्या भ‘मातून । मुक्त असावा सर्वस्वी  ॥ ४३ ॥  शिवागमसिद्घान्त-जाणता । सर्वशास्त्रप्रयोगज्ञाता । संशय-भ‘मापासून सर्वथा । पूर्ण मुक्त असावा  ॥ ४४ ॥  सत्यवक्ता धर्माचरणी । तत्पर गुरुपरंपरांच्या आचरणी । कुमार्गाचारवर्जित, शिवचिंतनी । मग्न सदैव असावा  ॥ ४५ ॥  शिवतत्त्वाच्या विवेकात । गढलेला स्वभावे शांत । भस्मोद्घूलनात निष्णात । भस्मतत्त्वाचा      जाणता  ॥ ४६ ॥  त्रिपुंड्रधारणी तत्पर । रुद्राक्षमालाविभूषित शरीर । धारण केलेले देहावर । असावे इष्टलिंगासी  ॥ ४७ ॥  इष्टलिंगपूजनी आसक्त । असावे लिंग-अंग-योगतत्त्व ज्ञात । दृढ असावी शिवाद्वैत-। भावना हृदयी तयाच्या  ॥ ४८ ॥  लिंग-अंगस्थलांचे पूर्ण । त्यास असावे सम्यक् ज्ञान । सर्वकाळ वाणीतून । मंगलवचने स्रवावी  ॥ ४९ ॥  ऐशा लक्षणांनी जो युक्त । त्या सद्गुरूपुढे व्हावे   नत । दर्भ घेऊनि हातात । शरण जावे शिष्याने  ॥ ५० ॥ 
सेवेत परमाचार्यं शिष्यो भक्तिभयान्वितः  ॥ ७ ॥ 
षण्मासान् वत्सरं वापि यावदेष प्रसीदति ।
भक्ति-भययुक्त अंत:करणे । सद्गुरुसेवा भक्ताने । करावी वर्ष सहा महिने । अथवा प्रसन्न होई तोवरी  ॥ ५१ ॥  चतुर्विध असे गुरुसेवा । आप्तसेवा स्थानसेवा । तिसरी असे अंगसेवा । सद्भावसेवा चतुर्थ  ॥ ५२ ॥  सखा सोयरा आप्त । सद्गुरूसी मानितो भक्त । आणि सेवितो सदोदित । ती असे ‘आप्तसेवा’  ॥ ५३ ॥  गुरुघर-कृषी-तपाची स्थाने । त्यांची नित्य निगा राखणे । ऐसे भक्ताचे जे   वागणे । तिला म्हणती ‘स्थानसेवा’  ॥ ५४ ॥  स्वकरे गुरूंचे चरणसंवाहन । करूनि राखणे त्यांचे मन । ऐसे भक्ताचे जे वर्तन । तिला नाव ‘अंगसेवा’  ॥ ५५ ॥  श्रीगुरूविषयी सदैव । मनी बाळगणे सद्भाव । या सेवेसी असे नाव । ‘सद्भावसेवा’ ऐसे  ॥ ५६ ॥  ऐसी चतुर्विध सेवा करावी । श्रीगुरूची प्रीती संपादावी । मग तो देतो मोक्षपदवी । संतुष्ट होऊनि भक्तासी  ॥ ५७ ॥ 
 प्रसन्नं परमाचार्यं भक्त्या मुक्तिप्रदर्शकम्  ॥ ८ ॥
प्रार्थयेदग‘तः शिष्यः प्रांजलिर्विनयान्वितः । भो कल्याण महाभाग शिवज्ञानमहोदधे  ॥ ९ ॥
आचार्यवर्य सम्प्राप्तं रक्ष मां भवरोगिणम् ।
जो शिवतत्त्वाचे देई ज्ञान । तो सद्गुरू होता प्रसन्न । शिष्याने द्वयकर जोडून । त्यास प्रार्थावे विनयाने  ॥ ५८ ॥  हे कल्याणकारक महाभाग्यवंत । शिवज्ञानसागर श्रेष्ठ ‘यात । मी जहालो भवरोगग‘स्त । शरण आलो रक्षण करी  ॥ ५९ ॥ 
इति शुद्घेन शिष्येण प्रार्थितः परमो गुरुः  ॥ १० ॥
शक्तिपातं समालोक्य दीक्षया योजयेदमुम् । दीयते च शिवज्ञानं क्षीयते पाशबन्धनम्  ॥ ११ ॥ 
यस्मादतः समा‘याता दीक्षेतीयं विचक्षणैः । सा दीक्षा त्रिविधा प्रोक्ता शिवागमविशारदैः  ॥ १२ ॥ 
वेधारूपा कि‘यारूपा मन्त्ररूपा च तापस ।
शुद्घान्त:करणी शिष्याने । केली प्रार्थना ऐकूनि कर्णे । गुरूने पाहावी शक्तिपात-चिन्हे । रोमांच अश्रू इत्यादी  ॥ ६० ॥  परशिव महालिंगाचे ज्ञान । जी देते प्राप्त करून । मल माया कर्म तीन । या पाशांना नाशिते  ॥ ६१ ॥  असा भवनाशक संस्कार । ज्यास दीक्षा म्हणती मान्यवर । ती दीक्षा द्यावी सत्वर । श्रीगुरूने शिष्यासी  ॥ ६२ ॥  कोणकोणते तीन पाश । सांगतो त्यांचे विशेष । या पाशांमुळे जीवात्म्यास । पशू ऐसे संबोधिती  ॥ ६३ ॥  पाश म्हणजेच मल । आणवमल मायामल । आणि तिसरा कार्मिक मल । हे असती मलत्रय  ॥ ६४ ॥  इच्छा-ज्ञान-कि‘याशक्ती । परशिवाठायी पूर्णत्वे वसती । त्याच जेव्हा संकोचिती । त्यांना म्हणती मलत्रय  ॥ ६५ ॥  इच्छाशक्ती जीवाठायी । ती संकोचता आणवमल होई । आणि अणुभाव येई । जीवात्म्याच्या हृदयात  ॥ ६६ ॥  परशिवस्वरूप पूर्ण असून । तो स्वत:सी समजे लहान । या अनुभवासी अभिधान । आणवमल ऐसे असे  ॥ ६७ ॥  परशिवाची ज्ञानशक्ती । संकोचता जीवाठायी ती । भेदबुद्घीची निर्मिती । करी जीवाच्या बुद्घीत  ॥ ६८ ॥  मी वेगळा तू वेगळा । जग वेगळे शिव निराळा । अभेदत्व दिसेनाच डोळा । तिला म्हणती मायामल  ॥ ६९ ॥  कि‘याशक्ती संकोचली । तीच कार्मिक मल झाली । शुभाशुभ वासनारूपे ठेली । जीवास कर्मी गुंतवाया  ॥ ७० ॥  जेव्हा कर्म करी नर । त्याचा उमटे मनी संस्कार । त्याच संस्कारासी थोर । ज्ञाते ‘वासना’ संबोधिती  ॥ ७१ ॥  पुन्हा कराया तेचि आचरण । हीच वासना असे कारण । शुभ आणि अशुभ दोन । प्रकार हे वासनेचे  ॥ ७२ ॥  परिवर्तन होता वासनेत । तरी कर्म बदले निश्चित । वाल्ह्याचे रूपांतर वाल्मीकीत । होते सर्वज्ञात हे  ॥ ७३ ॥  म्हणूनि परिवर्तन वासनेत । घडविणे हाचि असे  पुरुषार्थ । वासनापरिवर्तने कर्मात । परिवर्तन घडतेच  ॥ ७४ ॥  श्रीगुरू दीक्षासंस्काराने । त्रिमलाचे उखडती ठाणे । आणि होई शुद्घ सोने । जीवनाचे शिष्याच्या  ॥ ७५ ॥  हे तपस्वी अगस्त्य पंडित । जे शिवागमांत पारंगत । त्यांनी तीन भेद येथ । सांगितले दीक्षेचे  ॥ ७६ ॥  वेधादीक्षा कि‘यादीक्षा । आणि तिसरी मांत्री दीक्षा । श्रीगुरूने शिष्यपरीक्षा । करूनि द्याव्या त्यासी ह्या  ॥ ७७ ॥
गुरोरालोकमात्रेण हस्तमस्तकयोगतः  ॥ १३ ॥ 
यः शिवत्वसमावेशो वेधादीक्षेति सा मता । मान्त्री दीक्षेति सा प्रोक्ता मन्त्रमात्रोपदेशिनी  ॥ १४ ॥
कृपादृष्टीने शिष्याकडे पाहत । मस्तकी ठेवूनि वरदहस्त । श्रीगुरू शिवतत्त्व जागवीत । त्याच्या अंतर्यामीचे  ॥ ७८ ॥  हीच वेधादीक्षा जाण । दुसरी मांत्री करितो कथन । ज्याचे केल्यामुळे मनन । करितो रक्षण आपुले जो  ॥ ७९ ॥  तो पंचाक्षर मंत्र गुप्तपणे । शिष्य-कर्णात श्रीगुरूने । विधिपूर्वक उपदेशिणे । हीच मांत्री दीक्षा असे  ॥ ८० ॥ 
कुण्डमण्डलिकोपेता कि‘यादीक्षा कि‘योत्तरा । शुभमासे शुभतिथौ शुभकाले शुभेऽहनि  ॥ १५ ॥ 
विभूतिं शिवभक्तेभ्यो दत्त्वा ताम्बूलपूर्वकम् । यथाविधि यथायोगं शिष्यमानीय देशिकः  ॥ १६ ॥ 
स्नातं शुक्लाम्बरधरं दन्तधावनपूर्वकम् । मण्डले स्थापयेच्छिष्यं प्राङ्मुखं तमुदङ्मुखः  ॥ १७ ॥ 
शिवस्य नाम कीर्तिं च चिन्तामपि च कारयेत् ।
पंचकलशांचे स्थापन । स्वस्तिवाचन-मंडपादी कि‘या करून । केले जाते लिंगधारण । तिचे नाव कि‘यादीक्षा  ॥ ८१ ॥  पवित्र मासात शुभ तिथीस । शुभकाली शुभ दिवस । विडा-विभूती देऊन शिवभक्तास । गुरूने द्यावे निमंत्रण  ॥ ८२ ॥  शिष्ये करूनि दंतधावन । श्वेत वस्त्रे करावी परिधान । त्यासी गुरूने मंडपी आणून । पूर्वाभिमुख बैसवावे  ॥ ८३ ॥  स्वत: उत्तराभिमुख बैसून । शिवध्यान शिवनामोच्चारण । करवूनि घ्यावे शिष्याकडून । भक्तिपूर्वक यथाविधी  ॥ ८४ ॥ 
विभूतिपट्टं दत्त्वाग‘े यथास्थानं यथाविधि  ॥ १८ ॥ 
पंचब‘‘ह्ममयैस्तत्र स्थापितैः कलशोदकैः । आचार्यः सममृत्विग्भिस्त्रिः शिष्यमभिषिंचयेत्  ॥ १९ ॥
शास्त्रोक्त विधीने पूर्ण । सर्वांगी करावे विभूतिधारण । मंडपात करावे स्थापन । पंचब‘ह्मरूप पंचकलश  ॥ ८५ ॥  पंचाचार्य परंपरानुगत । श्रीगुरू शिवाचार्य पट्टाभिषिक्त । त्यांनी शिष्यासी करावे अभिषिंचित । कलशांतील जलाने  ॥ ८६ ॥  त्यावेळी आगमपारंगत । ऋत्विजांनी उच्च स्वरात । वेदघोष करावा मुक्त । श्रीगुरू जल सिंचताना  ॥ ८७ ॥ 
अभिषिच्य गुरुः शिष्यमासीनं परितः शुचिम् । ततः पंचाक्षरीं शैवीं संसारभयतारिणीम्  ॥ २० ॥
तस्य दक्षिणकर्णे तु निगूढमपि कीर्तयेत् । छन्दो रूपमृषिं चास्य देवतान्यासपद्घतिम्  ॥ २१ ॥
अभिषिंचनानंतर । जो समीप बैसला शिष्यवर । त्यासी उपदेशावा पंचाक्षर । दक्षिण कर्णी   गूढपणे  ॥ ८८ ॥  जो संसारभय करी दूर । तो महामंत्र पंचाक्षर । शिष्याविना कानावर । अन्य कोणाच्या पडू नये  ॥ ८९ ॥  मग पंचाक्षरी मंत्राचे । स्वरूप छंद ऋषी देवता यांचे । ज्ञान देऊनि न्यासपद्घतीचे । द्यावे स्वरूप समजावूनी  ॥ ९० ॥  दीक्षालक्षणगुरुकारुण्य-। स्थलाचे संपले निरूपण । आता पुढती लिंगधारण-। स्थल कथितो मुनिवरा  ॥ ९१ ॥  श्रोते स्मरा मागील कथन । विवरिलेले अष्टावरण । त्यात लिंग हे आवरण । एक असे कथिले हे  ॥ ९२ ॥  इष्टलिंग देहावरील । ते आवरण असे स्थूल । प्राण-भावलिंग अंतरातील । हे सूक्ष्म आवरण असे  ॥ ९३ ॥  लिंगस्वरूप आणि लिंगधारण । याचे पुढती विवेचन । मन:पूर्वक करा श्रवण । तेणे ज्ञान वाढेल  ॥ ९४ ॥ 
लिंगधारणस्थल - (५)
स्ङ्गाटिकं शैलजं वापि चन्द्रकान्तमयं तु वा । बाणं वा सूर्यकान्तं वा लिंगमेकं समाहरेत्  ॥ २२ ॥
सर्वलक्षणसंपन्ने तस्मिंल्लिंगे विशोधिते । पीठस्थितेऽभिषिक्ते च गन्धपुष्पादिपूजिते  ॥ २३ ॥
मन्त्रपूते कलां शैवीं योजयेद्विधिना गुरुः ।
श्रीगुरूने शिष्याहाती । इष्टलिंग द्यावे पुढती । ते कैसे असावे हे चित्ती । जपूनि ठेवी        कुंभोद्भवा  ॥ ९५ ॥  स्ङ्गटिकापासूनि निर्मिलेले । अथवा शिळेतूनि कोरलेले । किंवा बाण नर्मदेतले । घ्यावे लिंगाकरिता  ॥ ९६ ॥  अथवा चंद्रकांत सूर्यकांत । ह्या मण्यांपासूनि निर्मित । एक लिंग सर्वलक्षणयुक्त । घ्यावे पूर्ण परीक्षूनी  ॥ ९७ ॥  ते करपीठावरी ठेवावे । पंचगव्याने शुद्घ करावे । पंचामृताने अभिषेकावे । पूजावे गंधपुष्पादींनी  ॥ ९८ ॥  शिष्यमस्तकी जी स्थित । त्या शिवकलेसी करूनि आमंत्रित । पंचाक्षर-मंत्रे सुसंस्कृत । लिंगात तिला स्थापावे  ॥ ९९ ॥ 
शिष्यस्य प्राणमादाय लिंगे तत्र निधापयेत्  ॥ २४ ॥
तल्लिंगं तस्य तु प्राणे स्थापयेदेकभावतः । एवं कृत्वा गुरुर्लिंगं शिष्यहस्ते निधापयेत्  ॥ २५ ॥
शिष्याचा आकर्षूनि प्राण । तो शिवकलेने जे परिपूर्ण । त्या लिंगी करावा स्थापन । विधिपूर्वक श्रीगुरूने  ॥ १०० ॥  मग ते लिंग शिष्य-प्राणात । तादात्म्याने करावे स्थापित । जीवकला सामरस्ययुक्त । लिंग द्यावे शिष्यकरी  ॥ १०१ ॥  मग श्रीगुरूंनी शिष्यास । करावा पूर्ण उपदेश । लिंग-अंगसंबंध त्यास । समजावूनी सांगावा  ॥ १०२ ॥
प्राणवद्घारणीयं तत्प्राणलिंगमिदं तव । कदाचित्कुत्रचिद्वापि न वियोजय देहतः  ॥ २६ ॥
यदि प्रमादात्पतिते लिंगे देहान्महीतले । प्राणान् विमुंच सहसा प्राप्तये मोक्षसम्पदः  ॥ २७ ॥
शिष्या ऐक देऊनि अवधान । हे तुझे प्राणलिंग जाण । सदैव शरीरावरी करी धारण । तुझ्या प्राणासारखे  ॥ १०३ ॥  कोठेही येवो कसाही प्रसंग । तुझे शरीर आणि लिंग । यांचा होऊ नये वियोग । यासाठी सावध राहावे  ॥ १०४ ॥  देहापासूनि होऊनि अलग । चुकूनि भूमीवर पडले लिंग । तरी तत्काळ करी प्राणत्याग । तुज मिळेल मोक्षपद  ॥ १०५ ॥  याचा इतुकाचि इत्यर्थ । कोणत्याही परिस्थितीत । देहापासूनि लिंग वियुक्त । होऊ नये हे ध्यानी घे  ॥ १०६ ॥ 
इति सम्बोधितः शिष्यो गुरुणा शास्त्रवेदिना । धारयेत् शांकरं लिंगं शरीरे प्राणयोगतः  ॥ २८ ॥
शास्त्रवेत्त्या श्रीगुरूकडून । शिष्ये उपदेश करावा श्रवण । शिवरूप इष्टलिंग आमरण । धारण करावे देहावरी  ॥ १०७ ॥  ऐसा हा दीक्षासंस्कार । श्रीगुरू करिती शिष्यावर । त्याच्या जीवनी आमूलाग‘ । घडे यामुळे परिवर्तन  ॥ १०८ ॥  जीवनी परिवर्तन घडावे । ऐसी इच्छा मनी बळावे । तरी ब‘ह्मनिष्ठ गुरूसी जावे । शरण हाचि उपाय  ॥ १०९ ॥  शरीरावरील इष्टलिंग । हृदयातील प्राणलिंग । कारणशरीरातील भावलिंग । ही संपत्ती शिष्याची  ॥ ११० ॥  हेचि शाश्वत लिंगैश्वर्य । शिष्यासी देती श्रीगुरुवर्य । या ऐश्वर्यापुढे सर्व । तुच्छ शिष्याने मानावे  ॥ १११ ॥  असो आता ऐक पुढती । लिंगधारणेची महती । आणि धारणाची पद्घती । पूर्ण अवधान देऊनी  ॥ ११२ ॥
लिंगस्य धारणं पुण्यं सर्वपापप्रणाशनम् । आदृतं मुनिभिः सर्वैरागमार्थविशारदैः  ॥ २९ ॥
लिंगधारणमा‘यातं द्विधा सर्वार्थसाधकैः । बाह्यमाभ्यन्तरं चेति मुनिभिर्मोक्षकांक्षिभिः  ॥ ३० ॥
लिंगधारण पुण्यदायक । असे सर्वपापनाशक । आगमज्ञात्या ऋषिमहर्षींनी देख । केले लिंग- धारण  ॥ ११३ ॥  सर्वार्थसाधक लिंगधारण । त्याचे मुमुक्षू ऋषींनी जाण । असती कथिले भेद दोन । बाह्य आणि आभ्यंतर  ॥ ११४  ॥
चिद्रूपं परमं लिंगं शांकरं सर्वकारणम् । यत्तस्य धारणं चित्ते तदान्तरमुदाहृतम्  ॥ ३१ ॥ 
चिद्रूपं हि परं तत्त्वं शिवा‘यं विश्वकारणम् । निरस्तविश्वकालुष्यं निष्कलं निर्विकल्पकम ् ॥ ३२  ॥
सत्तानन्दपरिस्ङ्गूर्तिसमुल्लासकलामयम् । अप्रमेयमनिर्देश्यं मुमुक्षुभिरुपासितम्  ॥ ३३ ॥
परं ब‘ह्म महालिंगं प्रपंचातीतमव्ययम् ।
सर्व जगाचे मूलकारण । चिद्रूप लिंग परम पूर्ण । त्यास हृदयी करणे धारण । हे लिंगधारण आभ्यंतर  ॥ ११५ ॥  ते अंतर्लिंगरूप ब‘ह्म जाण । जड प्रपंचाहूनि विलक्षण । म्हणूनि त्यास विद्वान । ‘चिद्रूप’ ऐसे संबोधिती  ॥ ११६ ॥  सर्व जीवांहून वेगळे । तेणे ‘परमतत्त्व’ म्हणती सगळे । ते निरवयव असल्यामुळे । नाव दिले ‘निष्कल’  ॥ ११७ ॥  ते चराचर प्रपंचाचे मूळ । तरी प्रपंचदोषांपासून    सकळ । मुक्त सर्वस्वी, भेदरहित निर्मळ । म्हणूनि म्हणती ‘निर्विकल्प’  ॥ ११८ ॥  सत् चित् आनंद स्ङ्गूर्ती उत्साह । आदी सप्तदश कला सर्व । ते त्याचे स्वरूपी, ते अप्रमेय । आणि अनिर्देश्य        असे  ॥ ११९ ॥  अनिर्देश्य असूनि मोक्षार्थी जन । करिती त्याचे उपासन । ते विश्वातीत त्रिकालाकडून । असे पूर्ण अबाधित  ॥ १२० ॥  ऐसे जे शिवपरब‘ह्म पूर्ण । महालिंग त्याचेच अभिधान । तेचि प्रकाशे हृदयांतून । अंतर्लिंग जीवांच्या  ॥ १२१ ॥ 
तदेव सर्वभूतानामन्तस्त्रिस्थानगोचरम्  ॥ ३४ ॥
मूलाधारे च हृदये भ‘ूमध्ये सर्वदेहिनाम् । ज्योतिर्लिंगंं  सदा भाति यद्ब‘‘ह्मेत्याहुरागमाः  ॥ ३५ ॥
अपरिच्छिन्नमव्यक्तं लिंगंं ब‘ह्म सनातनम् । उपासनार्थमन्तःस्थं परिच्छिन्नं स्वमायया  ॥ ३६ ॥
ब‘ह्म म्हणती आगमांतरी । तेचि ज्योतिर्लिंग नांदते जीवांतरी । मूलाधारी हृदयस्थानावरी । आणि भ‘ूमध्यस्थानात  ॥ १२२ ॥  ही मु‘य स्थाने तीन । तेथे असते प्रकाशमान । गुरूपदेशानेच ज्ञान । होई त्याच्या स्वरूपाचे  ॥ १२३ ॥  अंतरी नांदते सनातन । ते ब‘ह्म अव्यक्त अपरिच्छिन्न । स्वमायेने झाले परिच्छिन्न । उपासनेस्तव भक्तांच्या  ॥ १२४ ॥  विश्वव्यापी शिव महान । इष्टलिंगरूपे होई लहान । करिता यावे पूजन ध्यान । निजभक्तांसी म्हणूनिया  ॥ १२५ ॥  ज्याच्यामध्ये सामावले । हे प्रचंड ब‘ह्मांड सगळे । तो शिव करपीठी खेळे । इष्टलिंगरूपाने  ॥ १२६ ॥ 
लयं गच्छति यत्रैव जगदेतच्चराचरम् । पुनः पुनः समुत्पत्तिं तल्लिंगंं ब‘ह्म शाश्वतम्  ॥ ३७ ॥
तस्माल्लिंगमिति ‘यातं सत्तानन्दचिदात्मकम् । बृहत्वाद् बृहंणत्वाच्च ब‘ह्मशब्दाभिधेयकम्  ॥ ३८ ॥
हे संपूर्ण चराचर विश्व । ज्याच्याठायी पावते लय । आणि ज्याच्यातूनि सर्व । पुनश्च होते       उत्पन्न  ॥ १२७ ॥  ऐसे जे परब‘ह्म शाश्वत । तेचि ‘लिंग’ नामे ‘यात । सर्वांहूनि असे बृहत् । म्हणूनि ‘ब‘ह्म’ संबोधिती  ॥ १२८ ॥  ज्यासी म्हणती परब‘ह्म । त्याचेच महालिंग असे नाम । आणि महालिंग हेचि ब‘ह्म । दृढ चित्ती धरावे  ॥ १२९ ॥ 
आधारे हृदये वापि भ‘ूमध्ये वा निरन्तरम् । ज्योतिर्लिंगानुसन्धानमान्तरं लिंगधारणम्  ॥ ३९ ॥
आधारे कनकप्र‘यं हृदये विद्रुमप्रभम् । भ‘ूमध्ये स्ङ्गटिकच्छायं लिंगं योगी विभावयेत्  ॥ ४० ॥
मूलाधारस्थानी वा हृदयात । अथवा भ‘ूकुटिमध्यात । ध्यावे ज्योतिर्मय लिंग सतत । हेचि आंतर लिंगधारण  ॥ १३० ॥  लिंगधारण कैसे करावे । शिवयोग्याने, सांगतो बरवे । मूलाधारस्थानी मानावे । लिंग सुवर्णासमान  ॥ १३१ ॥  पोवळ्यासारखे हृदयात । स्ङ्गटिकासमान भ‘ूमध्यात । प्रकाशमान लिंग असे नांदत । ऐसा भाव धरावा  ॥ १३२ ॥  त्या त्या स्थानी त्या समान । लिंग प्रकाशे ऐसे मानून । त्या लिंगाचे करावे ध्यान । अंतर्यामी आपुल्या  ॥ १३३ ॥ 
निरुपाधिकमा‘यातं लिंगस्यान्तरधारणम् । विशिष्टं कोटिगुणितं बाह्यलिंगस्य धारणात्  ॥ ४१ ॥
ये धारयन्ति हृदये लिंगंं चिद्रूपमैश्वरम् । न तेषां पुनरावृत्तिर्घोरसंसारमण्डले  ॥ ४२ ॥
अंतरी करणे लिंगधारण । त्यास निरुपाधिक हे अभिधान । ते बाह्य लिंगधारणेहून । श्रेष्ठ कोटी गुणांनी  ॥ १३४ ॥  चिद्रूप अंतर्लिंग हृदयात । धारण करिती जे शिवभक्त । त्यांना या संसारचक‘ात । जन्मा येणे नलगे  ॥ १३५ ॥ 
अन्तर्लिंगानुसंधानमात्मविद्यापरिश्रमः  । गुरूपासनशक्तिश्च कारणं मोक्षसम्पदाम्  ॥ ४३ ॥
वैराग्यज्ञानयुक्तानां योगिनां स्थिरचेतसाम् । अन्तर्लिंगानुसन्धाने रुचिर्बाह्ये न जायते  ॥ ४४ ॥
चिद्रूप अंतर्लिंगध्यान । अध्यात्मशास्त्राचे मनन-चिंतन । आणि गुरुसेवा ही तीन । साधने मोक्षप्राप्तीची  ॥ १३६ ॥  वैराग्यसंपन्न ज्ञानयुक्त । योगिजन जे स्थिरचित्त । अंतर्लिंगानुसंधानात । त्यांना गोडी अधिक  ॥ १३७ ॥ 
ब‘ह्मा विष्णुश्च रुद्रश्च वासवाद्याश्च लोकपाः । मुनयः सिद्घगन्धर्वा दानवा मानवास्तथा  ॥ ४५ ॥
सर्वे च ज्ञानयोगेन सर्वकारणकारणम् । पश्यन्ति हृदये लिंगं परमानन्दलक्षणम्  ॥ ४६ ॥
ब‘ह्माविष्णुरुद्रादी देव । इंद्रादी दिक्पाल मुनी सिद्घ गंधर्व । दानव मानवादी सर्व । हृदयी ध्याती लिंगासी  ॥ १३८ ॥  सर्व कारणांचे कारण । परमानंदस्वरूप लिंग ब‘ह्म पूर्ण । त्याचे ज्ञानदृष्टीने दर्शन । घेती आपुल्या हृदयांत  ॥ १३९ ॥
तस्मात्सर्वप्रयत्नेन शांकरं लिंगमुत्तमम् । अन्तर्विभावयेद्विद्वान् अशेषक्लेशमुक्तये  ॥ ४७ ॥
अन्तर्धारयितुं लिंगमशक्तः शक्त एव वा । बाह्यं च धारयेल्लिंगंं तद्रूपमिति निश्चयात्  ॥ ४८ ॥
अविद्या राग द्वेष । अस्मिता आणि अभिनिवेश । नांदती हे पंचक्लेश । हृदयी दु:खद       जीवाच्या  ॥ १४० ॥  या पंचक्लेशांचे निखंदन । करी अंतर्लिंगानुसंधान । म्हणूनि शिवभक्ताने  प्रयत्न-। पूर्वक ध्यावे लिंगासी  ॥ १४१ ॥  अंतर्लिंगधारणेत । समर्थ असो वा असमर्थ । त्याने स्ङ्गटिकादिपासूनि निर्मित । धारण करावे इष्टलिंग  ॥ १४२ ॥  जे माझिया करपीठावर । विराजे इष्टलिंग सुंदर । ते हृदयस्थ महालिंगाचे मनोहर । रूप आहे या निश्चयाने  ॥ १४३ ॥  अंतर्लिंगाचे कराया स्मरण । तत्स्वरूप जे इष्टलिंग पूर्ण । त्याचे देहावरी धारण । अवश्यमेव करावे  ॥ १४४ ॥
लिंगं तु त्रिविधं प्रोक्तं स्थूलं सूक्ष्मं परात्परम् । इष्टलिंगमिदं स्थूलं यद्बाह्ये धार्यते तनौ  ॥ ४९ ॥
प्राणलिंगमिदं सूक्ष्मं यदन्तर्भावनामयम् । परात्परं तु यत्प्रोक्तं तृप्तिलिंगं तदुच्यते  ॥ ५० ॥
स्थूल सूक्ष्म परात्पर । ऐसे लिंगाचे तीन प्रकार । धारण करिती जे देहावर । ते स्थूल        इष्टलिंग  ॥ १४५ ॥  हृदयामाजी सूक्ष्मलिंग । त्यासी म्हणती प्राणलिंग । जे श्रेष्ठ परात्पर भावलिंग । तृप्तिलिंग त्यास म्हणती  ॥ १४६ ॥ 
भावनातीतमव्यक्तं परब‘ह्म शिवाभिधम् ।
इष्टलिंगमिदं साक्षादनिष्टपरिहारतः । धारयेदवधानेन शरीरे सर्वदा बुधः  ॥ ५१ ॥
नाशूनि संसारपाश अनिष्ट । लाभूनि देई परमुक्ती इष्ट । तेचि इष्टलिंग श्रेष्ठ । असे परब‘ह्म-  स्वरूप  ॥ १४७ ॥  जे भावनातीत अव्यक्त । शिव नामे प्रसिद्घ निगमागमांत । ते परब‘ह्मचि व्यक्त । झाले इष्टलिंगातूनी  ॥ १४८ ॥  ऐसे इष्टलिंग ज्ञानी जने । धारण करावे सावधपणे । मनी विचार वागविणे । देव आहे देहावरी  ॥ १४९ ॥ 
मूर्ध्नि वा कण्ठदेशे वा कक्षे वक्षःस्थलेऽपि वा । कुक्षौ हस्तस्थले वापि धारयेल्लिंगमैश्वरम्  ॥ ५२ ॥
नाभेरधस्ताल्लिंगस्य धारणं पापकारणम् । जटाग‘े त्रिकभागे च मलस्थाने न धारयेत्  ॥ ५३ ॥
ऐक कोणकोणत्या ठायी । लिंगधारण करावे देही । मस्तकी कंठी कक्षेतही । वक्ष:स्थळी वा उदरावरी  ॥ १५० ॥  धारण करावे करतली । पण करू नये नाभीच्या खाली । जटेवरी पाठीवरी मलस्थली । करू नये धारण  ॥ १५१ ॥  जरी तेथे केले धारण । तरी ते पापासी कारण । लिंगधारणेची स्थले म्हणून । नीट घ्यावी समजूनी  ॥ १५२ ॥
लिंगधारी सदा शुद्घो निजलिंगंं मनोरमम् । अर्चयेद् गन्धपुष्पाद्यैः करपीठे समाहितः  ॥ ५४ ॥
बाह्यपीठार्चनादेतत् करपीठार्चनं वरम् । सर्वेषां वीरशैवानां मुमुक्षूणां निरन्तरम्  ॥ ५५ ॥
इष्टलिंगधारक शिवभक्त । परिशुद्घ असे सदोदित । त्याने करपीठावरी स्थित । करावे    इष्टलिंगासी  ॥ १५३ ॥  मग करूनि एकाग‘ मन । गंधपुष्पादींनी करावे पूजन । बैसले हृदयस्थ परब‘ह्म जाण । करतली या भावनेने  ॥ १५४ ॥  लिंग न ठेविता बाह्यपीठावर । ते ठेवूनि करपीठावर । पूजावे नित्य हेचि श्रेयस्कर । मुमुक्षू वीरशैवांना  ॥ १५५ ॥  इष्टलिंग स्थूलदेहावरी । प्राणलिंग सूक्ष्मशरीरी । भावलिंग कारणशरीरी । असे वीरशैवांच्या  ॥ १५६ ॥  प्राण-भावलिंगाचे ज्ञान । नसे ज्या साधका-लागून । त्याने इष्टलिंगाचे पूजन । तीन वेळा करावे  ॥ १५७ ॥  ते ऐक कैसे करावे । इष्टलिंगास अभिषेकावे । भस्म लावूनि मंत्रास जपावे । मग ठेवावे लिंगाकारी  ॥ १५८ ॥  हे झाले पहिले पूजन । मग स्वत: भस्म-रुद्राक्षादी धारण । करूनि सिद्घ व्हावे पूजेलागून । ही झाली ‘अंग’पूजा  ॥ १५९ ॥  आता करावे दुसरे पूजन । इष्टलिंगास रुद्राभिषेक करून । सर्व पूजाद्रव्यांनी पूर्ण । यथासांग पूजावे  ॥ १६० ॥  भस्म गंध बेल ङ्गूल । धूपदीपनैवेद्यादी सकल । अर्पूनि करावा निश्चल । मनाने गुरुमंत्रजप  ॥ १६१ ॥  मग लिंगासी जी अर्पिली । बेलङ्गुले ती सगळी । नेत्रांस भाळास लावूनि खाली । ठेवावी आदर-   पूर्वक  ॥ १६२ ॥  ही दुसरी पूजा जहाली । आता तिसरी पाहिजे केली । इष्टलिंग असे करतळी । त्यास करावा अभिषेक  ॥ १६३ ॥  वस्त्राने पुसूनि भस्म लावावे । त्यावरी तीन पळी तीर्थ घालावे । ते घालताना क‘मश: शब्द उच्चारावे । गुरु-लिंग-पादोदक  ॥ १६४ ॥  एक पळी तीर्थ घालावे । ‘गुरुपादोदक’ ऐसे म्हणावे । दुसरी पळी घालताना उच्चारावे । ‘लिंगपादोदक’ हे शब्द  ॥ १६५ ॥  तिसर्‍यांदा तीर्थ घालून । ‘जंगमपादोदक’ उच्चारून । मग ते तीर्थ संपूर्ण । प्राशन करावे           आदरे  ॥ १६६ ॥  ही जाणावी पूजा तिसरी । लिंग वंदूनि लिंगाकारी । ठेवूनि पारायण करावे चतुरी । श्रीसिद्धान्तशिखामणीचे  ॥ १६७ ॥  अशा करूनि पूजा तीन । इष्ट-प्राण-भावलिंगासी जाण । केल्या ऐसा भाव पूर्ण । मनी धरावा भक्ताने  ॥ १६८ ॥  अगस्त्या वीरशैवांनी पूर्ण । ज्ञानोत्तरही करावे आचरण । ऐक्यस्थली झाला म्हणून । लिंगपूजन त्यागू नये  ॥ १६९ ॥
ब‘ह्मविष्ण्वादयो देवा मुनयो गौतमादयः । धारयन्ति सदा लिंगमुत्तमांगे विशेषतः  ॥ ५६ ॥
लक्ष्म्यादिशक्तयः सर्वाः शिवभक्तिविभाविताः । धारयन्त्यलिकाग‘ेषु शिवलिंगमहर्निशम्  ॥ ५७ ॥
ब‘ह्मा विष्णू आदी देव । गौतमादी ऋषी सर्व । निजमस्तकी सदैव । करिती लिंगधारण  ॥ १७० ॥  लक्ष्म्यादी शिवभक्तिसंपन्न । शक्तिदेवता करिती लिंगधारण । म्हणूनि स्त्री-पुरुषांनी समान । लिंगधारण करावे  ॥ १७१ ॥
वेदशास्त्रपुराणेषु कामिकाद्यागमेषु च । लिंगधारणमा‘यातं वीरशैवस्य निश्चयात्  ॥ ५८ ॥
ऋगित्याह पवित्रं ते विततं ब‘ह्मणस्पते । तस्मात्पवित्रं तल्लिंगं धार्यं शैवमनामयम्  ॥ ५९ ॥
वेदशास्त्रपुराणांत । कामिकादी आगमांत । प्रतिपादिला सिद्घान्त । स्पष्ट लिंगधारणेचा  ॥ १७२ ॥  ऋग्वेदात ‘पवित्रं ते’ मंत्रात । संबोधिले ब‘ह्मणस्पती शिवाप्रत । चतुर्मुख ब‘ह्माचा अधिपती साक्षात । शिव असे हा अर्थ  ॥ १७३ ॥  हे ब‘ह्मणस्पते शिवादिभूम्यन्त । तुझे लिंगरूप छत्तीस तत्त्वांत । व्याप्त असूनि ते अत्यंत । पवित्र असे तुझ्यासाठी  ॥ १७४ ॥  म्हणूनि निर्दोष लिंगरूप शिव । शरीरी धारण करावा सदैव । ऐसे ऋग्वेदात अभिनव । लिंगधारण कथिले असे  ॥ १७५ ॥ 
ब‘ह्मेति लिंगमा‘यातं ब‘ह्मणः पतिरीश्वरः । पवित्रं तद्घि वि‘यातं तत्सम्पर्कात्तनुः शुचिः  ॥ ६० ॥
ते चतुर्मुख ब‘ह्माचा पती । परब‘ह्मनामे त्याची ‘याती । त्याच्या पवित्र संपर्के अती । तनू होते परिशुद्घ  ॥ १७६ ॥  जाणूनि वीरशैवांनी हे प्रमाण । नित्य करावे लिंगधारण । तेणे दोष जळूनि पूर्ण । देह-मन शुद्घ होई  ॥ १७७ ॥ 
अतप्ततनुरज्ञो वै आमः संस्कारवर्जितः । दीक्षया रहितः साक्षान्नाप्नुयाल्लिंगमुत्तमम्  ॥ ६१ ॥
ज्याने केले नाही तपाचरण । ज्याचे परिपक्व नाही अंत:करण । ज्यावरी वैराग्य नाही प्रसन्न । जो शिवसंस्कारवंचित  ॥ १७८ ॥  नित्यानित्यवस्तुविवेक । ज्याच्याठायी नाही चोख । ज्यावरी गुरुकृपा-   दृष्टी क्षणैक । ङ्गिरली नाही कधीच  ॥ १७९ ॥  ज्यासी गुरुकारुण्य नाही प्राप्त । जो शिवदीक्षेपासूनि वंचित । त्याने लिंग घेऊनि विकत । घालू नये गळ्यामध्ये  ॥ १८० ॥  स्त्रीने मंगळसूत्र घेऊन । स्वत:च्या गळ्यात घातले आपण । तरी तिचे झाले लग्न । ऐसे कोणी म्हणेना  ॥ १८१ ॥  विवाहसंस्कार झाल्याविण । ती विवाहिता न होय जाण । तैसे गुरुदीक्षेविना धारण । केले ते लिंगधारण नव्हे  ॥ १८२ ॥  गुरूकडूनि दीक्षा घ्यावी । मगच लिंगधारणा करावी । त्याने भोगप्राप्ती मोक्षपदवी । मिळे अन्यथा नाहीच  ॥ १८३ ॥ 
अघोराऽपापकाशीति या ते रुद्र शिवा तनूः । यजुषा गीयते यस्मात् तस्माच्छैवोऽघवर्जितः  ॥ ६२ ॥
हे रुद्रा तव लिंगरूपी शरीर । निष्पाप मंगलमय अघोर । ऐसा मंजुळ शिवस्वर । यजुर्वेदाने आळविला  ॥ १८४ ॥  म्हणूनि इष्टलिंगधारक वीरशैव । तो निष्पाप असे सदैव । ऐसे लिंगधारण एकमेव । आहे कल्याणकारक  ॥ १८५ ॥ 
यो लिंगधारी नियतान्तरात्मा नित्यं शिवाराधनबद्घचित्तः ।
स धारयेत् सर्वमलापहत्यै भस्मामलं चारु यथाप्रयोगम्   ॥ ६३ ॥
ज्या लिंगधारकाचे निर्मल मन । जो नित्य शिवपूजेत तल्लीन । अशा शिवभक्ताने परिमार्जन । सर्व दोषांचे होण्यासाठी  ॥ १८६ ॥  मनोहर आणि निर्मळ । ऐसे भस्म शुभ‘धवल । धारण करूनि आपुले भाल । सुशोभित करावे  ॥ १८७ ॥  ऐसे हे लिंगधारणस्थल । श्रोतेहो विवरिले सकळ । रेणुकाचार्य बोधिती प्रेमळ । मुनी अगस्त्यालागूनी  ॥ १८८ ॥  लिंग वीरशैवांचे धन । लिंग वीरशैवांचा प्राण । केल्याने लिंगधारण । होते मलत्रयनिवृत्ती  ॥ १८९ ॥  लिंगधारण-पूजा-ध्यान । याने पापे नष्ट होऊन । जीव होऊनि पुण्यवान । पुण्यकुंजच होतसे  ॥ १९० ॥  मनोवृत्ती बाहेरी पळे । लिंगध्याने ती आत वळे । आत्मदर्शन त्यामुळे । होई मुमुक्षू जीवांना  ॥ १९१ ॥  म्हणूनि श्रोतेहो ध्यानी धरावे । लिंगधारण सदैव करावे । लिंगपूजा-ध्यान करूनि व्हावे । कृतकृत्य जीवनात  ॥ १९२ ॥  लिंगधारण करा हे कथिले । पण ते खाली पडले, ङ्गुटले । झाले अवमानित, हरवले । तर काय करावे भक्ताने?  ॥ १९३ ॥  तेही सांगतो तुम्हांस । श्रवण करावे सावकाश । ‘कारणागमा’त पार्वतीस । सर्व शिवाने कथिले             हे  ॥ १९४ ॥  पार्वतीने केले प्रश्न । शिवाने केले समाधान । तेचि संक्षिप्त करून । साध्या शब्दांत सांगतो  ॥ १९५ ॥  निद्रेत अवधान हरवले । लिंग अंगाखाली आले । तर ते अवमानित झाले । त्यावेळी काय करावे  ॥ १९६ ॥  निद्रेचा भर विशेष । पत्नीचा पाय लागे पतीस । सकाळी पतीसी वंदिता दोष । तिचा जाई निघूनी  ॥ १९७ ॥  तैसे भक्ताने सकाळी उठून । लिंग दोन्ही डोळ्यांसी लावून । त्यासी करिता वंदन । तो होय दोषमुक्त  ॥ १९८ ॥  पूजेची चुकली वेळ । तर मंत्र जपावा अष्टोत्तरशत वेळ । आपत्काळी पूजा-जप सकळ । चुकला तर घ्यावे प्रायश्चित्त  ॥ १९९ ॥  दुसरे दिनी स्नान करून । गुरू आणि लिंगाची क्षमा प्रार्थून । इष्टलिंगपूजा यथासांग करून । मंत्र सहस्रवेळा जपावा  ॥ २०० ॥  गंधाक्षता ङ्गूल बिल्वपान । जर पूजेवेळी पडले न्यून । तर प्रत्येक न्यूनासाठी जाण । करावा जप एकशे आठ  ॥ २०१ ॥  लिंग पडता भूवरी । त्यास त्वरित घेऊनि करी । क्षमा मागूनि जपावा सत्वरी । अष्टोत्तरशत वेळा मंत्र  ॥ २०२ ॥  श्रीगुरूने दिले जे इष्टलिंग । ते हरवले अथवा झाले भंग । तरी ङ्गुटले तुकडे जोडूनि सांग । कलान्यास करूनि पुजावे  ॥ २०३ ॥  इष्टलिंगाचे झाले चूर्ण । तर श्रीगुरूकडूनि घ्यावे नूतन । गुरूने चूर्ण लिंगातील कलान्यास पूर्ण । नव्या लिंगात करावा  ॥ २०४ ॥  जर हरवले इष्टलिंग । तर तत्क्षणी करावा प्राणत्याग । ते शक्य नसेल तरी मग । त्याचा शोध करावा  ॥ २०५ ॥  एकवीस दिवसपर्यंत । आहार न घेता किंचित । मूलमंत्र सर्वत्र जपत । इष्टलिंग शोधावे  ॥ २०६ ॥  ते न सापडले तर जाण । करावे वेगी प्राणार्पण । ते शक्य नसे तरी गुरूकडून । घ्यावे नूतन           इष्टलिंग  ॥ २०७ ॥  हरवल्या लिंगातील शिवकला । श्रीगुरूने आकर्षूनि सगळ्या । नव्या लिंगात पाहिजे केल्या । प्रतिष्ठापित समंत्र  ॥ २०८ ॥  याउपरी सापडले जुने लिंग । तरी ते गुरूसी दाखवूनि   मग । गुर्वाज्ञेने जळी सवेग । निक्षेपावे सत्वर  ॥ २०९ ॥  पार्वती पुसे शंकरालागून । लिंग हरवता सोडिला  प्राण । तरी त्याचा अंत्यसंस्कार जाण । सांगा कैसा करावा  ॥ २१० ॥  जरी लिंगरहित शरीर । तरी त्यावरी न होय संस्कार । अन्य लिंग घालूनि केला तर । प्राणत्याग ठरे निरर्थक  ॥ २११ ॥  शिव म्हणती तू सुजाण । तू विचारिला उचित प्रश्न । लिंग हरवताक्षणी त्यागिला प्राण । तरी तो गेला मोक्षासी  ॥ २१२ ॥  प्राणार्पण नाही निरर्थक । त्या जीवाचे झाले सार्थक । त्यासी लाभला शिवलोक । हे निश्चित जाणावे  ॥ २१३ ॥  परि लिंगरहित शरीर । त्याचा कैसा करावा अंत्यसंस्कार? । तरी नूतन लिंग घेऊनि त्यावर । गुरूने संस्कार करावे  ॥ २१४ ॥  हरवल्या लिंगातील कलांस । आवाहन करूनि अशेष । नूतन लिंगात करावा न्यास । श्रीगुरूने समंत्र  ॥ २१५ ॥  मृत जीवाच्या देहावर । ते लिंग घालावे सत्वर । मग करावा अंत्यसंस्कार । लिंगासहित मृताचा  ॥ २१६ ॥  श्रोतेहो कारणागमातील । श्‍लोकाधारे हे विवरिले  सकळ । परि स्वत:वर अशी वेळ । येऊ नये हे पाहावे  ॥ २१७ ॥  इष्टलिंगास प्राणापरी जपावे । पूर्ण प्रमादरहित वागावे । ते पडावे ङ्गुटावे हरवावे । ऐसे घडू देऊ नये  ॥ २१८ ॥  आता पुढील अध्यायात । अधिक विवरिला शिवसिद्घान्त । तो श्रवण करावयास शांत । चित्त असावे श्रोत्यांचे  ॥ २१९ ॥   शिवस्वरूप जगद्गुरुवर । श्रीकाशीमहास्वामीजी चंद्रशेखर । त्यांच्या आज्ञेने ग‘ंथ मधुर । रचितो शेषनारायण  ॥ २२० ॥  श्रीसिद्घान्तशिखामणितत्त्वामृत । सद्भावे परिसोत शिवभक्त । होतील मने भक्तियुक्त । षष्ठोऽध्याय पूर्ण हा  ॥ २२१ ॥
 ॥  ॐ तत्सदिति श्रीशिवगीतेषु सिद्घान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे
वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगिशिवाचार्यविरचिते श्रीसिद्घान्तशिखामणौ
अंगस्थलांतर्गतभक्तस्थले दीक्षागुरुकारुण्यलिंगधारणस्थलप्रसंगो नाम षष्ठः परिच्छेदः  ॥
  ॥  श्रीशिवार्पणमस्तु  ॥